निवडक पत्रकारांनाच पत्रकार परिषद, उर्वरितांवर अन्यायाचा आरोप
पनवेल | दै. क्षितिज पर्व
पनवेल महानगरपालिकेकडून पत्रकारांमध्ये दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक पत्रकारांकडून करण्यात येत आहे. महत्त्वाच्या घडामोडी, निर्णय आणि कार्यक्रमांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदांना केवळ निवडक पत्रकारांनाच बोलावले जाते, तर अनेक मान्यताप्राप्त व कार्यरत पत्रकारांना जाणूनबुजून डावलले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, पालिकेच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये काही पत्रकारांना समाविष्ट केले जात नाही, असा अनुभव वारंवार येत असल्याचे पत्रकारांचे म्हणणे आहे. अनेक वेळा आपला मोबाईल क्रमांक लेखी व तोंडी स्वरूपात देऊनही, “नंबर पाठवा”, “ऍड करतो” असे सांगून महिनोन्महिने नंबरच ऍड केला जात नाही, ही बाब संशय निर्माण करणारी आहे.
पालिकेच्या माध्यम विभागाकडून जर माहिती प्रसारणात पारदर्शकता असेल, तर सर्व पत्रकारांना समान वागणूक का दिली जात नाही?
फक्त ‘आपल्या मर्जीतील’ किंवा ‘अनुकूल’ पत्रकारांनाच माहिती देण्यामागे नेमका हेतू काय?असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेशी अशी भेदभावाची भूमिका घेतली जात असेल, तर ती लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी असल्याचे मत पत्रकार व्यक्त करत आहेत. माहिती देणे हा उपकार नसून पालिकेची जबाबदारी आहे, हे प्रशासन विसरत तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या बाबत पनवेल महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी खुलासा करावा व सर्व पत्रकारांना समान वागणूक द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

संपादक – क्षितिज पर्व
संपर्क – 9594494771