क्षितिज पर्व News

‘सुखकर्ता’वर भेंडखळच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन! भेडखळ ग्रामस्थांचा सन्मान राखला जाईल : महेंद्रशेठ घरत

उलवे / क्षितिज पर्व

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१६) ‘सुखकर्ता’वर भेंडखळच्या ग्रामस्थांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची भेट घेतली आणि आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

उरण तालुक्यातील भेंडखळचे लंकेश ठाकूर या युवा कार्यकर्त्याला भेंडखळ पंचायत गणातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मिळावी, अशी एकमुखी मागणी भेंडखळ ग्रामस्थ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केली.
आजपर्यंत आम्ही सर्वांचा सन्मान ठेवून पक्षाचे प्रमुख नेते सांगतील तेथे मतदान केले; परंतु यावेळी फक्त काँग्रेसचाच उमेदवार हवा, इतर घटक पक्षांचे उमेदवार भेंडखळ गणातून आम्ही स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका भेडखळ पंचायत गणातून मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मांडली.
लंकेश ठाकूर हा युवा कार्यकर्ता होतकरू आहे. त्याचे परिसरात चांगले काम आणि जनसंपर्क आहे. त्याच्यासाठी यंदा वातावरणही पोषक आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या हाताच्या निशाणीसमोर आम्हाला मतदान करायचे आहे. यासाठी आपण काहीही करा, पण भेंडखळ पंचायत समिती गण फक्त काँग्रेसलाच मिळायला हवा, असे मत अनेक कार्यकर्त्यांनी मांडले.
यावेळी उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनीही सर्व कार्यकर्त्यांना विश्वास दिला की, आमची बोलणी सकारात्मक दिशेने चालू आहेत, यातून निश्चितच चांगला मार्ग निघेल.
महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मला लोकभावना मान्य आहेत. गाव करील ते राव करील काय, असे म्हटले जाते. त्यामुळे एखाद्या उमेदवाराच्या मागे संपूर्ण गाव असेल तर ती निश्चित आनंदाची बाब आहे. उरण तालुक्यामध्ये महालण विभागामध्ये भेंडखळ पंचायत गणामध्ये आपली ताकद मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे यावेळी गावातील सर्व कार्यकर्त्यांचा आदर राखून काँग्रेस पक्षाच्या वतीने लंकेश ठाकूर यांना उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.”
यावेळी श्रीयश घरत, संध्या ठाकूर, नरेश म्हात्रे, परशुराम भोईर, निर्मला पाटील, यशवंत म्हात्रे, नाशिकेत म्हात्रे, सुरेश ठाकूर, दीनानाथ ठाकूर, बोकडवीरा काँग्रेस अध्यक्ष उमेश पाटील, भेंडखळ काँग्रेस अध्यक्ष प्रमोद ठाकूर, रमेश ठाकूर, गंगाराम पाटील यांनी आपली मते मांडली.
यावेळी जासई ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मुरलीधर ठाकूर, ग्रामपंचायत भेंडखलचे उपसरपंच अजित ठाकूर, माजी उपसरपंच दीपक ठाकूर, बोकडवीरा उपसरपंच ध्रुव पाटील, पागोटे काँग्रेस अध्यक्ष सुजित पाटील उपस्थित होते. वैभव ठाकूर यांनी आभार मानले.

Share

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *