क्षितिज पर्व News

सूरज डुबता भी है जितेंद्र आव्हाड यांचे मत

उरणमध्ये जनशक्तीचा विजय होईल : महेंद्रशेठ घरत

उलवे, ता. १५ : “भाजपला सत्तेचा माज आहे, तो उरणची जनता उतरवील, सूरज निकलता है, तो डुबता भी है”, असे मत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उरण येथे नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केले.

“उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत होईल. त्यात नगराध्यक्षपदी जनशक्तीच्या जोरावर महाविकास आघाडीच्या उमेदवार भावनाताई घाणेकर विजयी होतील. कारण त्या स्थानिक आहेत, त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे, महाराष्ट्रात विविध पातळ्यांवर त्या सामाजिक काम करत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उरणची जनता धनशक्तीला बळी पडणार नाही. त्यामुळे जनशक्तीच्या ताकदीवर भावनाताई घाणेकर नगराध्यक्षपदी विराजमान होतील. येथील जनता बाहेरचा उमेदवार आता स्वीकारणार नाही. सर्वसामान्य जनतेने बरेवाईट अनुभव घेतलेत, दिबांचे नाव आजही नवी मुंबई विमानतळाला दिले गेले नाही, त्यामुळे भूमिपुत्रांच्या अस्मितेशी कुणी खेळणार असेल तर यंदा जनता निश्चितच प्रामाणिकपणे मतदान करून धडा शिकवील,” असा ठाम विश्वास आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी उरण येथे व्यक्त केला.

यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भावनाताई घाणेकर म्हणाल्या, “मी कायम जनतेच्या सानिध्यात आणि सेवेत आहे. स्थानिक आहे. भाजप १५ वर्षे सत्तेत असूनही उरणला चांगले रस्ते नाहीत, शहरातील गटारांची अवस्था दयनीय आहे, जागोजागी कचऱ्याचे ढीग आहेत. नागरिकांनी हे किती दिवस सहन करायचे. त्यामुळे जनतेला बदल हवा आहे, यंदा महाविकास आघाडीच्या वतीने मी चांगल्या मताधिक्क्याने नगराध्यक्षपदी निवडून येईन. महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी जिवाचे रान करतील आणि यंदाच्या उरण नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी दणदणीत विजय मिळवील.”

यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार मनोहर भोईर, कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, अल्पसंख्याक अध्यक्ष अखलाख शिलोत्री आणि महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *